सर्वसमावेशक प्रयत्नांमुळेच संजय नगरातील स्थिती नियंत्रणात-  उपजिल्हाधिकारी सरीता सुत्रावे

सर्वसमावेशक प्रयत्नांमुळेच संजय नगरातील स्थिती नियंत्रणात-  उपजिल्हाधिकारी सरीता सुत्रावे


          औरंगाबाद/प्रतिनिधी 


औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी येथील संजयनगर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. मात्र प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे येथील गंभीर परिस्थिती वेळेत योग्य पद्धतीने नियंत्रित करणे शक्य झाले. यामध्ये संजय नगरातील नागरिक,कार्येकर्ते, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीसांचे प्रयत्न आणि स्वयंसेवकांचे सहकार्य उल्लेखनीय असल्याचे उपजिल्हाधिकारी तथा संजय नगर कन्टेंनमेंट झोनच्या नियंत्रण अधिकारी सरीता सुत्रावे यांनी सांगितले.


          संजय नगर परिसरातील कोवीड संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना श्रीमती सुत्रावे म्हणाल्या, येथील पोलीस यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशावर्कर, स्वयंसेवक , पेट्रोलिंग पथक या सर्वांचे खुप सहकार्य लाभले आहे. पोलीस निरीक्षक शरद इंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली पाथ्रीकर,वॉर्ड अधिकारी श्रीमती चव्हाण यांच्या सह फुट पेट्रोलिंगसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकाद्वारे या ठिकाणी आम्ही दररोज येथील परिसरात पाहणी करतो. त्यामध्ये प्रामुख्याने येथील नागरिकांच्या ज्या काही लहानसहान समस्या असतील तर या जाणून घेतल्या नंतर त्यांचे तातडीने निराकरण करण्यात येते. तसेच या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून येथील रहिवाशांच्या जीवनावश्यक बाबींची पूर्तता आम्ही करतो. येथे आधी औषधी दुकाने मेडीकल्स सुरू नव्हते पण आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत ते सुरू करण्यात आले आहेत. तसेच येथील डॉक्टरांनी दवाखाने देखील सुरू केले आहेत. यासोबत या परिसरात ज्या काही स्थानिक समस्या होत्या त्या आम्ही सर्वाच्या संयुक्तिक प्रयत्नातुन चांगल्या प्रकारे सोडवलेल्या आहेत. आमच्या सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळत असून रूग्ण संख्या नियंत्रित आहे.या परिसरातील आजपर्यंत ११० रुग्णांपैकी ८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


          या ठिकाणी ज्या चार गल्ल्यांमध्ये रूग्ण आढळून आले , त्या ठिकाणी तर सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. त्या सोबतच परिसरातील इतर भागात ही स्वयंसेवक नेमण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा,वस्तु उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच येथे महानगर पालिकेमार्फत ताप तपासणी दवाखाना ही सुरु करण्यात आला आहे. त्यामध्ये नागरिकांना वैद्यकीय सेवा, औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रशासनाच्यावतीने विविध यंत्रणांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजनांना या ठिकाणी यश मिळत असल्याचे श्रीमती सुत्रावे यांनी सांगितले.


          ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आशा वर्कर्स यांचे योगदान ही महत्त्वपूर्ण ठरते आहे.आठ आशा वर्कर्स आणि पाच सिस्टर यांच्या मदतीने या ठिकाणी होम क्वारंटाईन असलेल्यांची दैनंदिन आरोग्य तपासणी, तब्येतीतील बदल या गोष्टींची नोंद घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत असल्याचे पर्यवेक्षक लहु घोडके यांनी सांगितले.


पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील होम क्वारंटाईन असलेल्या लोकांच्या घरात प्रत्यक्ष संपर्कात जाऊन काम करताना भीती वाटली नाही . कारण एकतर गेल्या दहा वर्षांपासून आरोग्य यंत्रणेनेत काम करण्याचा अनुभव आहे.आणि या परिस्थितीतीला रोखण्यासाठी सगळे प्रयत्न करतात त्यात आपला खारीचा वाटा असावा , या विचाराने काम करत असल्याच्या भावना येथील आशा वर्कर मीना केदारे यांनी व्यक्त केल्या.


          संजय नगर मधील ज्या गल्लीत जास्त रूग्ण आढळून आले तेथील रहिवाशांपैकी काहींनी सामाजिक जबाबदारी स्विकारून ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नायब तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केले होते.त्याला प्रतिसाद देत काही लोक स्वयंसेवक म्हणून सहकार्य करण्यासाठी पुढे आले.त्यांच्या द्वारा रूग्ण आढळून आलेल्या गल्ल्यांमध्ये रहीवाशांना सर्व आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यातील सचिन अशोक तुपे यांनी या ठिकाणी प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे आमच्या भागातील परिस्थिती वेळेत नियंत्रणात आणता आली.मनपा, पोलिस आणि सुत्रावे मॅडम,नायब तहसीलदार गायकवाड साहेब यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी खुप चांगले प्रयत्न करून आम्हा सर्वांना सुरक्षित ठेवल्याच्या भावना व्यक्त केल्या. या परिसरातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश निकाळजे यांनी प्रशासनाने खुप खबरदारीने या ठिकाणी नागरिकांना समजून घेत सहकार्य केले. येथील हे समस्या सोडविण्यासाठी तातडीने प्रयत्न केले.त्याबद्दल सर्व अधिकारी, पोलिस, डॉक्टर,स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांचे आम्ही आभारी असल्याचे सांगितले.