वृक्ष लागवडीतून रोजगार निर्मितीसाठी संबंधित शासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत -पालकमंत्री अमित देशमुख
लातूर/ प्रतिनिधी
सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवड ही योजना प्रत्येक गावात व शिवारात राबवली पाहिजे. व या वृक्षलागवड मोहिमेतून प्रत्येक गावात रोजगार निर्मिती चे प्रयत्न करावेत; त्यासाठी महिला बचत गटांमधील महिला सदस्यांना रोपवाटिकेचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोपवाटिकेचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित लातूर तालुका आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख मार्गदर्शन करत होते.यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, लातूर पंचायत समितीच्या सभापती सौ.सरस्वती पाटील, तहसीलदार स्वप्निल पवार, गटविकास अधिकारी श्यामराव गोडभरले उपस्थित होते. तसेच या बैठकीस तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व गावचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग व कृषी विभागाने संयुक्तपणे महिला बचत गटातील सदस्यांना रोपवाटिका व्यवसाय करण्याकरिता रोपवाटिकेचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. बचत गटातील महिलांच्या हाताला काम मिळेल व त्यातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल या महिलांनी तयार केलेली रोपे शासन घेईल, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्याच्या किमान काही गावात तरी "शून्य कचरा" मोहीम राबवावी. ड्राय कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच ज्या गावांना समशान भूमी नाही त्या गावासाठी शासकीय गायरान जमीन अथवा खाजगी व्यक्तीची जमिनी विकत घेऊन उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासकीय यंत्रणेने काम करावे, अशी सूचना श्री देशमुख यांनी केली.
लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी गावाच्या विकास कामाबाबत दिलेली सर्व निवेदनावर उचित कारवाई करून ते कामे मार्गी लावली जातील असे श्री देशमुख यांनी सांगितले. सर्व शासकीय यंत्रणेने ग्रामीण भागातच रोजगार निर्मिती उपलब्ध करता यावी या पद्धतीने कामे हाती घ्यावीत. तसेच याकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामीण भागात सुरू करावेत असे आवाहन त्यांनी केले.
सर्व शासकीय यंत्रणेने त्यांना देण्यात आलेल्या सूचना व निर्देशांचे पालन करून सुचवलेली कामे तात्काळ मार्गे लावण्याबाबत ची कार्यवाही पूर्ण करावी व केलेल्या कामाचा कार्यपूर्ती अहवाल सादर करावा असे निर्देश श्री देशमुख यांनी दिले. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणेने दिलेली कामे वेळेत पूर्ण करावीत व सर्वसामान्य माणसाचे प्रश्न तातडीने सोडवले जातात अशी शासनाची प्रतिमा लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे ही निर्देश त्यांनी दिले.
Covid-19 च्या अनुषंगाने नागरिकांनी घाबरून जाऊ नये व शासन व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी करून लोकांनी स्वयंशिस्त पाळल्याशिवाय कोरोना मुक्ती मिळणार नाही असे श्री देशमुख यांनी सूचित केले.
यावेळी लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सरपंच यांनी गावामध्ये अखंड विज पुरवठा, सार्वजनिक सिंचनविहीर, कचरा डेपो, समशानभूमी,रेशन दुकान, गावाला जोडले जाणारे रस्ते व अंतर्गत रस्ते बाबतचे प्रश्न मांडून त्याचे निरसन करण्याची मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्निल पवार यांनी तसेच संबंधित यंत्रणा चे तालुका प्रमुखांनी लवकरच यावर कार्यवाही करून कामे मार्गे लावले जातील असे सांगितले.